शैक्षणिक संस्था या एखादया कुटुंबासारख्या असतात- बसवराज पाटील
मुरूम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) : संस्थेतील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊ शकतात परंतु त्यांनी कामाच्या माध्यमातून जी प्रतिमा तयार केली आहे. त्यातून ते कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाहीत. जी माणसे चांगला विचार करून सेवाभावीवृत्तीने कार्य करतात आणि सतत कार्यमग्न राहतात. त्यांचे व्यक्तिमत्व इतरांना निश्चितच आदर्शवत राहू शकते. माणसांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये असणारे चांगले गुण हे इतरांना निश्चितच दिशादर्शक ठरतात. या संस्थेने चांगली माणसे निवडल्यामुळेच संस्थेची तर उंची वाढतेच परंतु विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे नावही होते. माझे व प्रवीण गायकवाड यांच्या वडिलांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. अशा शैक्षणिक संस्था या एखादया कुटुंबासारख्याच असतात असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहातमध्ये आयोजित प्रतिभा निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सोमवारी (ता. ३) रोजी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष रामकिशन मालपाणी, सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, आष्टा कासारचे शिवकुमार स्वामी गुरुजी, प्रकाश आळंगे, आप्पाराव अल्लीसे, बाबुराव कांबळे, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, डॉ. सतिश शेळके, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. श्रीराम पेठकर, उपप्राचार्य सुधीर अंबर, सत्कारमूर्ती प्रवीण गायकवाड व त्यांच्या पत्नी प्राजक्ता गायकवाड आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, या शैक्षणिक संस्थेत काम करण्याची गायकवाड सरांना संधी मिळाल्याने आणि सेवानिवृत्तीच्या सत्काराप्रसंगी चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार होणे म्हणजे त्यांच्या जीवनाला एक प्रकारची ऊर्जा मिळणे होय. याप्रसंगी शरणजी पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रवीण गायकवाड सरांनी या संस्थेमध्ये जे काम केले आहे. ते काम निश्चितच चांगले असून ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असतील परंतु आमच्या संस्थेच्या परिवारातून ते सेवानिवृत्त होणार नाहीत. यापुढेही त्यांनी अशीच जबाबदारी घेऊन कार्यतत्पर राहावे याकरिता त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्राचार्य दिलीप गरुड यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, संस्थेने माझ्यावर जी जबाबदारी व विश्वास टाकला तो मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब गंगावणे (उस्मानाबाद), किरण गायकवाड, आनंद कांबळे, आर. जी. गायकवाड, राहूल वाघ, वैभव कांबळे, आर. एन. सोनवणे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे तर आभार डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave A Comment