मुरुम, ता. उमरगा, ता. ३० (प्रतिनिधी) : या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे परिसरातील हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे संसार उभे राहिले. त्यामुळे हा सहकारी तत्वावरील साखर कारखाना लोकांच्या मालकीचा असल्याने तो टिकलाच पाहिजे आणि सहकार चळवळ ज्या उद्येशाने यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांनी निर्माण केली ती सहकारी चळवळ जीवंत ठेवण्यासाठी सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून शेतकऱ्यांनी खंबीरपणे साथ देवून विठ्ठलसाईच्या पाठीशी उभे राहावे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी गुरूवारी (ता. ३०) रोजी मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. प्रारंभी दिवंगत माधवराव पाटील उर्फ काका यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, विराट कल्याणी, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, संचालक शरणाप्पा पत्रिके, विठ्ठल पाटील, केशव पवार, माणिक राठोड, संगमेश्वर घाळे, विठ्ठल बदोले, अँड. विलास राजोळे, शिवलिंग माळी, दिलीप भालेराव, राजीव हेबळे, अँड. व्ही. एस. आळंगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरड, विकास हाराळकर, मदन पाटील आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, या भागातील शेती हा मुख्य व्यवसाय असून ऊस हे नगदी पीक व हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठया प्रमाणात लागवड केली आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखानदारी हे खऱ्या अर्थाने निसर्गावर अवलंबून आहे. पण या कारखानदारीला दरवर्षी विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. ही साखर कारखानदारी टिकविणे हीच सर्वांची मोठी जबाबदारी आहे. सध्या कारखानदारी चालविणे हे मोठे आव्हान असल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विठ्ठलसाईला साह्य करावे. यंदा कारखान्याने पाच लाखापेक्षा अधिकचे उद्यिष्टये ठेवून गळीत हंगामासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आपल्या कारखान्याला नुकतीच डिस्टीलरी प्रकल्पाची मान्यता मिळाली आहे. या परिसरातील एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या उसाला योग्य तो भाव दिला जाईल. विठ्ठलसाईचे नाव राज्यभर करुन सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले. सुरुवातीला कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व त्यानंतर अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु पाटील यांनी तर आभार संचालक विठ्ठलराव बदोले यांनी मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave A Comment