मुरूम, ता. ५ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात भूगोल विभागाच्यावतीने आयोजित एन्व्हायरमेंटल असेसमेंट ऑफ कोविड-१९ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे बुधवारी (ता.५) रोजी आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे मार्गदर्शक गोवा राज्यातील मल्लिकार्जुन चेतन मंजू महाविद्यालय, कॅनाकॉनाचे प्रा. डॉ.एफ.एम.नदाफ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ.दादासाहेब गजहंस यांनी केले. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे होते. या राष्ट्रीय वेबिनारकरिता देशभरातील विविध राज्यासह ६६३ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ.दादासाहेब गजहंस मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशाचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असून संपूर्ण देश आर्थिक मंदीच्या संकटात सापडला आहे. सध्या सर्वच क्षेत्रावर परिणाम झाल्यामुळे उद्योगधंदे, वाहतूक, पर्यटन, सांस्कृतिक, क्रीडा व शिक्षण आदी क्षेत्र बंद झाली. यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होऊन सामान्य जनतेचेही हाल होत आहेत. प्रोफेसर एफ.एम.नदाफ म्हणाले की,
कोरोनाचा आता देशाच्या विविध क्षेत्रात विघातक परिणाम झालेला आहे. पण पर्यावरण प्रदूषण मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. कारण उद्योगधंदे, वाहतुकीमुळे हवेचे व आवाजाचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होत होते आणि जलप्रदूषणही झाले होते परंतु या लाँकडाऊनच्या काळात पर्यावरण प्रदूषणावर मात्र चांगला परिणाम झाला आहे.
या वेबिनारचे समन्वयक प्रा.डॉ.नरसिंग कदम यांनी प्रास्ताविक केले. डॉ.विलास खडके यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. झूम अँपवर शंभर प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला तर उर्वरित सहभागी प्रतिनिधींसाठी यू ट्यूब चँनलवरुन सोय करण्यात आली. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी संगणक तंत्रज्ञ प्रा.सचिन राजमाने, प्रा. लक्ष्मण पवार, डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.प्रकाश कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन वेबिनारचे आयोजक डॉ. सुभाष हुलपल्ले तर भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.पुरुषोत्तम बारवकर यांनी आभार मानले.
Leave A Comment