वृत्तपत्र हा समाज मनाचा आरसा असून जनतेच्या समस्यांचे प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजे – संपादक संजय आवटे
उमरगा तालुका पत्रकार समितीच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी) :
वृत्तपत्र हा समाज मनाचा आरसा असून पत्रकारांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजामधील विविध समस्यांवर प्रकाश टाकून त्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. पत्रकारांनी सातत्याने प्रशासकीय यत्रणेमुळे दुःखी असणाऱ्या जनतेचा आवाज बनण्याची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय समीक्षक तथा दिव्य मराठीचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
उमरगा तालुका पत्रकार समन्वय समितीच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. सहा) रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व पारितोषिक समारंभाप्रासंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव होते. उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, ज्येष्ठ पत्रकार देवीसिंग राजपूत, उपप्राचार्य डॉ.संजय आस्वले, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.किरण सगर, विजय वाघमारे, धीरज बेळंबकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, उमरगा रोटरी क्लबचे सचिव अनिल मदनसुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उमरगा तालुका पत्रकार समितीच्या वतीने दर्पण दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकारांचा ५० लाखांचा विमा उतरविण्यात आला. यावेळी कोरोना काळात ईदगाह कोवेड सेंटर लोकसहभागातून चालवून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या बाबा जाफरी, खाजा मुजावर यांच्यासह मुस्लिम सहकारी युवकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बहुजन हिताय वसतीगृह येथे कोवीड सेंटर चालविण्यास परवानगी देणाऱ्या संस्थेचाही सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ” इंटरनेटच्या युगात वृत्तपत्रांचे महत्त्व व जनतेच्या अपेक्षा ” या विषयावरील ऑनलाईन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सफाई कामगार असूनही आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या आई- वडिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठवाडास्तरीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पत्रकार अविनाश काळे व शंकर बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरिक्षक आघाव यांनी पत्रकार दिनाच्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तर तहसीलदार संजय पवार यांनी डिजीटल मिडीयामध्ये भेसळ होत असल्याने विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा सकाळी वृत्तपत्र हातात येते, असे मत व्यक्त केले. प्राचार्य जाधव यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी पत्रकार अमोल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रदिप भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर पत्रकार प्रा.डॉ.महेश मोटे, बालाजी वडजे, गुंडू दुधभाते यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे तर आभार सुभाष जेवळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.युसुफ मुल्ला, नारायण गोस्वामी , मारोती कदम, समीर सुतके, मनीष सोनी, बालाजी माणिकवार, दत्ता नांगरे, विलास व्हटकर, गुंडू दूधभाते, शरद गायकवाड, महेश निंबरगे, गोपाळ अहंकारी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील सर्व वृत्तपत्राचे पत्रकार, वार्ताहार, विक्रते, विद्यार्थी, पालक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave A Comment