आपली कर्तव्ये आयोगाने दिलेल्या निर्देशाच्या चौकटीत राहून चोखपणे पार पाडावीत -उपजिल्हाधिकारी प्रताप काळे
जिल्हयातील 74 मतदान केंद्रावरील 90 सुक्ष्म निरीक्षकांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूकसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी आता काही दिवस राहिलेले आहेत. आज उस्मानाबाद जिल्हयातील 74 मतदान केंद्रावरील 90 सुक्ष्म निरीक्षकांची दुसरे आणि शेवटचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ही मतदान प्रक्रिया अतिशय महत्वाची असून सर्व सुक्ष्म निरिक्षकांनी आपली कर्तव्य आयोगाने दिलेल्या निर्देशाच्या चौकटीत राहून चोखपणे पार पाडावीत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी केले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन सभागृहात सुक्ष्म निरीक्षकांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या प्रसंगी श्री.काळे बोलत होते. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी अनंत कुभार यांच्या समवेत जिल्हयातील आठही तालुक्याचे सर्व नोडल अधिकारी आणि सर्व सुक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.
पुढे बोलताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी काळे म्हणाले की, प्रत्येक सुक्ष्म निरीक्षकाला फक्त एकाच मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर रोजी संबंधित नोडल अधिकारी आणि त्या तालुक्याच्या तहसिलदाराकडे रूजू होणे अपेक्षित आहे. तसेच संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त असलेले मतदान केंद्राअध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या वाहनात जावयाचे आहे, असे त्यांनी सुचित केले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारच्या सुरक्षा उपाय योजना अंमलात आणले जात आहेत. प्रत्येक मतदान केंद्र 100 टक्के सॅनिटाईज आणि निर्जतूकीकरण करण्यात येत आहे. त्यामूळे आपण कसलीही काळजी बाळगु नये प्रत्येक अधिकाऱ्यास कोरोना सेफ्टी किट उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये मास्क, सॅनिटाइझर, हॅन्डगलोज, फेससील्ड इत्यादीचा समावेश असणार आहे. तसेच येणाऱ्या मतदारासही मास्क नसल्यास तो दिला जाणार एक आरोग्य कर्मचारी केंद्रावर थर्मल स्कॅनर व्दारे सर्व मतदाराची तपासणी करतील असेही काळे यावेळी म्हणाले. या निवडणूकीत सुक्ष्म निरीक्षकांची महत्वाची भुमिका असून ते निवडणूक निरीक्षक व आयुक्त यांचा दुवा आहे. मतदान केंद्रावरील कार्यपध्दतीचे निरीक्षण, केंद्रावर काम कसे चालू आहे यांची अचुक माहिती देण्याची जबाबदारी आपली असते. त्यामुळे केंद्रावर वेळेवर पोहचणे, पोलींग स्टॉफला सुपरवाईज करण्यापेक्षा फक्त निरीक्षण करणे, आपल्याकडे देण्यात आलेले फॉर्म व्यवस्थीत भरणे आणि तहसिलदाराकडे हे फॉर्म सादर करणे ही महत्वाची जबाबदारी आहे, असे श्री काळे यांनी स्पष्ट केले.मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान केंद्राचे स्थळ पाहून येणे आवश्यक आहे. प्रत्येकाकडे निवडणूक आयेागाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.ओळखपत्र असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यास मतदान केंद्र परीसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे श्री.काळे यांनी सांगून प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिडीओ शुटींग आणि वेबकास्टींग व्दारे पाहणी करण्यात येणार असून सुक्ष्म निरीक्षकांने मतदान प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता कामा नये. आपली जबाबदारी फक्त निरीक्षणाची आहे. याचे सर्वानी भान ठेवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या .
निवडणूक निरीक्षक यांनी व्हिडीओ कॉन्फर्रन्स
व्दारे सुक्ष्म निरीक्षकासोबत साधला संवाद
आज झालेल्या या प्रशिक्षणाच्या अखेरीस 05- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक वेणुगोपाल रेडडी यांनी जिल्हयातील नोडल अधिकारी आणि सुक्ष्म निरीक्षकांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आठही जिल्हयातील सुक्ष्म निरीक्षकांना त्यानी निवडणूक कामांकरिता शुभेच्छा दिल्या.
या प्रशिक्षणाच्या वेळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही उपस्थित सुक्ष्म निरीक्षकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात त्यांचे आगमन झाले होते.
Leave A Comment