October 15, 2020
By Admin Basav Pratishthan
जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
जिल्ह्यातील तलाव, बंधारे, मध्यम प्रकल्प व मोठे प्रकल्प यातील पाणीसाठा व सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी
उस्मानाबाद, दि. 15(जिमाका):- जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिनांक 17 ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे त्यानुषंगाने सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये तालुकास्तरीय बैठका घेऊन सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या गावांचा अंदाज घ्यायचा. कोणत्या पद्धतीने सर्व नुकसानग्रस्त गावाचे पंचनामे तातडीने होतील यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी आपापल्या गावात थांबून नुकसानीचा व्यवस्थित अंदाज घ्यायचा व अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावयाची आहे असेही त्यांनी सूचित केले.
शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना सर्व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यावे, संवेदनशील असले पाहिजे. त्यासाठी नियमाने व अधिक गतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले.
तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी व जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले मोठे, मध्यम प्रकल्प व बंधारे यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याकडील पाणी प्रकल्पात किती पाणी आहे. तसेच त्या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात किती पाऊस झालेला आहे त्याचा अंदाज घेऊन धोक्याची पातळी ओलांडली जात असल्यास कधी पाणी सोडणे गरजेचे आहे या सगळ्याचा लेखी अंदाज घ्यावयाचा आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल संबंधित तहसीलदार यांना सादर करावा. जेणेकरून योग्य ते निर्णय घेणे सोयीचे होणार आहे. सर्वांनी अत्यंत दक्ष राहून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयी थांब याबाबत यापूर्वीच निर्देशित करण्यात आलेले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आपापल्या विभागाच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे पाहायचे आहे. जिल्ह्यातील तलाव, बंधारे, मध्यम प्रकल्प व मोठे प्रकल्प यातील पाणीसाठा व सुरक्षितता यांचा विचार करून आवश्यक खबरदारी करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले.
Post Views:
847
Related Post
Leave A Comment