October 16, 2020
By Admin Basav Pratishthan
अतिवृष्टीमुळे आपत्तीत सापडलेल्या 126 लोकांचे जीव वाचवणाऱ्या एसडीआरएफ जवानांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
उस्मानाबाद/तुळजापूर, दि.16(जिमाका):- भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी उस्मानाबाद जिल्ह्यात झाली. त्यामुळे लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पातून पाणी नदी-नाले यात सोडण्यात आले. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. या पुरामुळे लोहारा, उमरगा व परांडा तालुक्यातील जवळपास बारा ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली व यामध्ये 126 लोक अडकले होते. त्या सर्व लोकांना राज्य शीघ्र कृती दलाच्या पथकाने वेळेत बाहेर काढून त्यांचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात राज्य शीघ्र कृती दलातील (SDRF)सहा जवानांचा श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तुळजापूर येथे मंदिर प्रशासनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते SDRF जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी आशिष लोकरे, व मंदिर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिवेगावकर पुढे म्हणाले की मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात 80 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होऊन अतिवृष्टी झाली त्यामुळे जवळपास बारा ठिकाणी पुरामुळे आपत्तीची परिस्थिती येऊन त्यामध्ये जवळपास 126 लोक अडकले होते त्या सर्व लोकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व राज्य शीघ्र कृती दलाच्या जवानांनी सुखरूपपणे सुरक्षित बाहेर काढले.या पथकांनी खूप मोठी कामगिरी बजावून 126 लोकांपैकी एकाही व्यक्तीचा जीवितास धोका निर्माण होऊ दिला नाही त्यामुळे या जवानांचे कौतुक त्यांना प्रोत्साहन देणे अगत्याचे आहे.जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसात झालेल्या अतिवृष्टी काळात महसूल, पोलीस व इतर सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून चांगले काम केले व पुढील काळात ही असेच परस्परात समन्वय ठेवून चांगले काम केले गेले पाहिजे असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते एस. डी. आर.एफ. जवानांचा सत्कार यामध्ये पोलीस निरीक्षक श्री.वाघमोडे, पोलीस हवालदार पी.बी. मुंडे, पोलीस नाईक ए.एम. काझी, पोलीस कॉन्स्टेबल सर्वश्री ए. एम. जमादार, बी.पी.आडे, आर.डी. म्हस्के व बी.सी. जाधवर यांचा समावेश आहे.
Post Views:
438
Related Post
Leave A Comment