तालुका काँग्रेस समितीच्या वतीने दररोज सातशे जणांना अन्नदान
मुरूम: काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनातून बाधित रुग्ण व नातेवाईकांना मिळतोय आधार
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण व नातेवाईकांना अन्नदान वेळी शरण पाटील, दिलीप भालेराव, महेश माशाळकर आदी
मुरूम ता.१२ : कोरोना संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाईकांची लॉकडाउनमुळे जेवणाची अडचण होत असल्याने काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनातून उमरगा व लोहारा तालुक्यातील सातशे जणांना दररोज भरपेठ जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारच्या सत्रात सरकारी, खाजगी कोविड सेंटर व कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्ण व नातेवाईकांपर्यत जेवणाचा डबा पोहच करीत आहेत.
उमरगा, लोहारा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग गतीने वाढला आणि अनेकांना त्याची बाधा झाली. गरिब कुटुंबातील अनेक रुग्णांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी निर्माण होत असल्याने काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री. पाटील यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय करून कोरोनासंदर्भात मदत केंद्र सुरू केले. कार्यकर्त्यांनी उपचारासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या शहर व परगावच्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणासाठी होणारी कमालीची अडचण लक्षात घेऊन तालुका काँग्रेस समितीच्या वतीने एक मे पासून उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय, सात खाजगी कोविड सेंटर व दोन कोरोना केअर सेंटर आणि लोहारा तालुक्यातील दोन कोरोना केअर सेंटर येथे दररोज सातशे जणांपर्यंत कार्यकर्ते जेवणाचा डबा पोहच करताहेत. मुरूम येथे आचाऱ्यामार्फत दर्जेदार जेवणाची तयारी पहाटे पासुनच सुरू असते. अकरानंतर जेवणाचे पार्सल डबे वहानातुन थेट रुग्णालयापर्यंत पोहच होतात. मुरूम बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते शरण पाटील अन्नदानाचे काम सुरळीत ठेवण्यासाठी लक्ष देऊन पाहणी करतात. जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव यांनी गेल्या महिन्यापूर्वी कोरोनावर मात करून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेत कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत अन्नदानाचे कार्य सुरू रहाणार असल्याचे श्री. भालेराव यांनी सांगितले. तालुका काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, उमरगा नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, मुरूम नगराध्यक्षा सौ अनिता अंबर, पंचायत समितीचे सभापती सचीन पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, कंटेकुर सरपंच गोविंद पाटील, उल्हास गुरगुरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार, नगरसेवक विक्रम मस्के, महेश माशाळकर, विजय वाघमारे, परमेश्वर टोपगे, अनिल (पप्पू) सगर, सोहेल इनामदार, चंद्रकांत मजगे, जीवन सरपे, बाबा मस्के, व्यंकट पवार, बालाजी पवार, श्री. तुकशेट्टी, राहुल स्वामी व मुरूम शहर अध्यक्ष सुधीर चव्हाण,तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, राजू मुल्ला,गौस शेख, श्रीहरी शिंदे पाटील आदी कार्यकर्ते रुग्णालयात जाऊन जेवणाच्या डब्याचे वितरण करतात.
Leave A Comment